Showing posts with label marathi. Show all posts
Showing posts with label marathi. Show all posts

Wednesday, September 5, 2012

शिक्षक दिन. असामान्य दिन.



शिक्षक म्हणजे शुद्धीकरण. समाजाच्या लहान तसंच मोठ्या घटकांचं. दैववाद्यांच, बुद्धिवाद्याचं, राजकारणचं आणि समाजमनाचं.

कारण पालक जरी आपल्या मुलांना चांगली शिक्षा देत असलो तरी शिक्षक हा संपूर्ण समाजाचा पालक असतो. देशाचा द्रष्टा असतो. समाजाचा शिक्षक असतो. शिक्षक एक मुल नाही तर समाज घडवत असतो. शिक्षक चुकला तर समाज चुकलाच समजा. म्हणून शिक्षकाला समाजात असामान्य महत्व आहे. गुरु शिष्याच्या नात्याला महत्व आहे.

शरीरातले अशुद्ध रक्त हृदयात जाऊन शुद्ध होते आणि शरीराला नवचैतन्य देते त्याच प्रमाणे समंजस आणि असमंजस समाज शिक्षकाच्या हात खालून घडतो आणि समाजाला नवचैतन्य देतो आणि सुसमृद्ध करतो. आपण शाळेत शिकून समाजात वावरतो, पैसा आणि प्रसिद्धी कमावतो. मात्र शिक्षक हृदयातील झडपांप्रमाणे तेथेच अढळ राहतो. प्रसिद्धी आणि पैसा यापासून अलिप्त राहतो. या त्याच्या असामान्य बलिदानाची जाण ठेवून त्याला समाजात योग्य स्थान देऊया, मान देऊया.

शिक्षक दिनानिमित्त या त्यांच्या कार्याला सलाम करूया!

Wednesday, July 11, 2012

गुंतुनी गुंत्यात साऱ्या...

नाती जशी जुळतात, तशीच ती रोज नवनवे भावविश्व गाठत असतात. रोजच्या आयुष्यात नवे अनुभव देत असतात. कधी कधी काही देऊन जातात तर कधी कधी काही तरी घेऊन जातात... काही तरी शिकून जातात तर कधी कधी काही शिकवून जातात... यानेच आपले जीवन समृद्ध होत जाते आणि समृद्ध अनुभवांची शिदोरी पुरवून जातात. जीवनात नवरसांनी समृद्ध असे अनुभव असतील तरच त्याला अर्थ आहे.
मात्र कधी कधी नाती उलगडताना ती गुंता निर्माण करून जातात. गुंतुनी गुंत्यात साऱ्या, गुंता माझा वेगळा. म्हणजे सर्वांच्या आयुष्यात गुंता सारखाच असतो, मात्र बघायचा दृष्टीकोण प्रत्येकाचा वेगळा. म्हणूनच प्रत्येकाचा अनुभव वेगळा. हे कधी सुखद तर कधी दु:खद. फक्त थोडासा वेळ देऊन ह्या गुंत्याकडे नवीन दृष्टीकोणाने पहिला तर हा सोडवणं सोपं जातं. गुंते सोडवायचे कि अजून वाढवायचे हे आपल्यावर! गुंत्या शिवाय आयुष्य म्हणजे अळणी जेवण.