Monday, September 21, 2020

मायलेकी

 "दादा माझ्या बुटाचा सोल खूप गुळगुळीत झालाय रे. सटकायला होतं... कॉलेजमध्ये मी किती तरी वेळा पडता पडता वाचलेय माहितेय!" दादर मार्केट मध्ये माझ्या बरोबर फिरता फिरता मला गौरी तिचं गाऱ्हाणं सांगत होती. अन मी इकडे तिकडे दुकानं पाहत मध्येच आपलं 'हुं' करत चालत होतो. काय लागेल ते शॉपिंग करत होतो. दादर मार्केटमधून कधी एकदाची शॉपिंग उरकून घरी जातोय असा झाला होतं.

तसा माझ्या बहिणीचा स्वभावच होता, काही ना काही सतत सांगत असे. डोक्यात सतत विचार चालू असत. तिच्या विचारांपेक्षा तिच्या विचार करण्याची पद्धत मला विचित्र आणि मजेशीर वाटत असे. अन कधी कधी विचित्र आणि गंभीर.
दादर स्टेशनला पोहोचल्यावर पुलावरून चालत असताना माझं तिच्या काळजीपूर्वक चालण्याकडे लक्ष गेलं. तिच्याहि ते लक्षात आलं. ती लगेच म्हणाली, " अरे दादा, या पायऱ्यांच्या कडेला असलेल्या गुळगुळीत पट्ट्यांवरून सटकायला होतंय रे. म्हणून." सरळ विचार ऐकून मी 'हुं' केलं.
पण काहीतरी उगाचंच विचारावा म्हणून मी विचारलं, "का गं, पडण्याची भीती वाटते का?"
मी विचार केल्या प्रमाणेच वेगळं उत्तर मिळालं, "नाही."
"मग?", मी विचारलं. "लोक हसतील नं, म्हणून." ती म्हणाली.
"म्हणजे? पडून लागण्याची भीती नाही वाटत?" मी हसू दाबत गंभीरपणे विचारलं. "नाही रे. चालता चालता मी पडले आणि लोकांनी पहिला तर ते हसतील नं."
"होय गं ताई, पण ज्यांनी पहिला ते लोक तुला दिवसभर थोडीच दिसणार आहेत लाज वाटायला?" मी म्हणालो
"होय रे. पण ते लोक घरी गेल्यावर इतर लोकांना सांगतील नं. ऑफिसमध्ये, घरी, कि आज एक मुलगी कशी गमतीदार पणे पडली ते.", ती म्हणाली.
"ते ठीक आहे, नाव थोडी लक्षात ठेवणार आहेत तुझा ते? आणि समजा पडलीस तर काय करशील?"
"उठून लगेच पाळायला लागेन मी आणि गर्दीपासून पहिले दूर जाईन..."
"खूप दुखत असेल तर, आणि पाळता येत नसेल तर...?" मी म्हणालो. यावर तिने काही विषय वाढवला नाही.
घरी आल्यावर मी, गौरी आणि आई जेवायला बसलो असताना मी सहज विषय काढला. मी तीची गम्मत सांगणार तेवढ्या तिने आईला विचारलं, "ए आई, तू गर्दीमध्ये घसरून पडलीस तर काय करशील गं?"
"पटकन उठून पळून जाईन, गर्दीपासून दूर... मला नाही बाबा आवडणार कोणी माझ्यावर हसलेलं" आई म्हणाली. विजयश्रीच्या मुद्रेत तिने माझ्याकडे पाहिलं.
या मायलेकीना समजावून काही उपयोग नाही हेच खरं... मी आपलं हसून जेवणच पसंत केलं.

माझ्या आईने कसं जगावं?

 माझी आई. तिने गोदाकाठच्या नांदेडमध्ये खूपच सुंदर घराण्यात जन्म घेतला. तिचं आयुष्य म्हणजे एक सुंदर कथाच आहे. भाऊ भावंडं सोबत जगायला, खेळायला. मायाळू आई, वडील आणि वडीलधारे, मोठे कर्तव्यदक्ष भाऊ आणि बहीण व लहाने प्रेम देणारे. सर्व सांभाळून घेणारे. बहिणीप्रमाणे असणाऱ्या भावजयी आणि जिव्हाळा लावणारी नातवंड.


छान शाळा, घर आणि आनंद देणारं आयुष्य. मग तिचं लग्न झालं आणि संसाराची कर्तव्ये व मुलांच्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या. त्या सुद्धा तिने अगदी मन लावून पार पडल्या. अगदी नवरा गेल्यावर पण खंबीरपणे मुंबईत राहून मुलांना सांभाळलं आणि मोठा केलं. आता ती झाली ६० वर्षाची. तिने कसं जगावं? तिला माहित असेल कसा जगावे पण आयुष्यातील कठीण प्रसंग आपल्याला सुचू देत नाही. मला अशी अशा आहे कि मलाहि कोणीतरी ६० झाल्यावर असंच उठवेल आणि आठवण करून देईल.

तारेवरची कसरत करत थोडक्यात संसार भागविणाऱ्या आईने मुक्तहस्ते जगावं.
जबाबदाऱ्यांचामागे स्वतःचं आयुष्य किंवा ज्या गोष्टी बाजूला ठेवल्या होत्या त्या हातात घ्यावात.
नवर्याच्या शिस्तबद्ध वागण्यामागे वेळेचं जे वेळापत्रक आखलं होतं ते मोडून स्वतःला वेळ द्यावा.
कर्तव्य किंवा चिंता याबाबत भाऊ, बहिण, वाहिनी यांच्याशी जे बोलणं होई त्या सोडून त्यांची जागा मनमोकळ्या गप्पांनि घ्यावी.

तिचं आयुष्य जन्मल्या पासून २५व्या वर्षापर्यंत जे बहरलं ते ६०व्या वर्षानंतर उतारवयात परत तसंच बहरावं. त्याला आयुष्याने आणि दुनियादारीने दिलेल्या अनुभवाच्या परिपक्वतेची किनार असावी.
६० नंतर तिने हळू हळू,
२५ असताना जसं निर्भीडपणे जगायची तसं जगावं.
२४ मध्ये असताना असलेल्या मुक्तपणे जागावं.
२३ असताना जसं मनमोकळेपणाने जगायची तसं जगावं.
२२ असताना जसं आनंदीपणे जगायची तसं जगावं.
२१ असताना जसं उमेदीने जगायची तसं जगावं.
२० असताना जसं नवनिर्मितीच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवायची तसं जगावं.
१९ असताना जशी स्वप्न पाहायची तशी पाहावी आणि मुलांकडून ती पूर्ण करून घ्यावीत.
१८ असताना स्वतंत्रतेचा आलेला पहिला अनुभव घ्यावा.
१७ असताना मैत्रिणीशी असलेली जवळीक साधावि.
१६ असताना केलेल्या गमती कराव्यात.
१५ असताना भावंडांशी जी जवळीक होती ती साधावि.
१४ असताना पाहिलेली स्वप्न पूर्ण करावीत.
१३ असतानाचा असलेला हट्टीपणा करून मुलांकडून तो पूर्ण करून घ्यावात.
१२ असतानाच्या गमती नातवांसोबत कराव्यात.
११ असताना आवडीच्या असलेल्या गोष्टी मुलांना सांगाव्यात.
१० असताना झालेल्या आठवणींना उजाळा द्यावा.
९ असताना असलेल्या निरागसतेला परत आयुष्यात आणावे.
८ असताना निर्माण झालेल्या कुतूहलाची पुनरावृत्ती करावी.
७ असताना असलेल्या साध्या साध्या गोष्टीतून मिळणारा आनंद शोधावा.
६ असताना मोजून मापून न जगण्याची पुनरावृत्ती करावी.
५ असताना मिळालेल्या कौतुकाची आठवण करावी आणि लोकांना तशीच द्यावी.
४ असताना मिळालेल्या निर्भेळ प्रेमाची आठवण करावी.
३ असताना छोट्या असणाऱ्या पण मोठ्या वाटणाऱ्या गोष्टींचा धांडोळा घ्यावा.
२ असताना कमी गरजा असल्या तरी सुंदर आयुष्याची आठवण करावी.
१ असताना आपण कोणीहि नसताना आपण किती महत्वाचे आहोत हि आपल्याला आई वडिलांनी दिलेली वागणूक आठवावी.

लहान मुल व्हावे.
मला वाटते माझ्या आईने असे जगावे.

Wednesday, September 5, 2012

शिक्षक दिन. असामान्य दिन.



शिक्षक म्हणजे शुद्धीकरण. समाजाच्या लहान तसंच मोठ्या घटकांचं. दैववाद्यांच, बुद्धिवाद्याचं, राजकारणचं आणि समाजमनाचं.

कारण पालक जरी आपल्या मुलांना चांगली शिक्षा देत असलो तरी शिक्षक हा संपूर्ण समाजाचा पालक असतो. देशाचा द्रष्टा असतो. समाजाचा शिक्षक असतो. शिक्षक एक मुल नाही तर समाज घडवत असतो. शिक्षक चुकला तर समाज चुकलाच समजा. म्हणून शिक्षकाला समाजात असामान्य महत्व आहे. गुरु शिष्याच्या नात्याला महत्व आहे.

शरीरातले अशुद्ध रक्त हृदयात जाऊन शुद्ध होते आणि शरीराला नवचैतन्य देते त्याच प्रमाणे समंजस आणि असमंजस समाज शिक्षकाच्या हात खालून घडतो आणि समाजाला नवचैतन्य देतो आणि सुसमृद्ध करतो. आपण शाळेत शिकून समाजात वावरतो, पैसा आणि प्रसिद्धी कमावतो. मात्र शिक्षक हृदयातील झडपांप्रमाणे तेथेच अढळ राहतो. प्रसिद्धी आणि पैसा यापासून अलिप्त राहतो. या त्याच्या असामान्य बलिदानाची जाण ठेवून त्याला समाजात योग्य स्थान देऊया, मान देऊया.

शिक्षक दिनानिमित्त या त्यांच्या कार्याला सलाम करूया!

Wednesday, July 11, 2012

गुंतुनी गुंत्यात साऱ्या...

नाती जशी जुळतात, तशीच ती रोज नवनवे भावविश्व गाठत असतात. रोजच्या आयुष्यात नवे अनुभव देत असतात. कधी कधी काही देऊन जातात तर कधी कधी काही तरी घेऊन जातात... काही तरी शिकून जातात तर कधी कधी काही शिकवून जातात... यानेच आपले जीवन समृद्ध होत जाते आणि समृद्ध अनुभवांची शिदोरी पुरवून जातात. जीवनात नवरसांनी समृद्ध असे अनुभव असतील तरच त्याला अर्थ आहे.
मात्र कधी कधी नाती उलगडताना ती गुंता निर्माण करून जातात. गुंतुनी गुंत्यात साऱ्या, गुंता माझा वेगळा. म्हणजे सर्वांच्या आयुष्यात गुंता सारखाच असतो, मात्र बघायचा दृष्टीकोण प्रत्येकाचा वेगळा. म्हणूनच प्रत्येकाचा अनुभव वेगळा. हे कधी सुखद तर कधी दु:खद. फक्त थोडासा वेळ देऊन ह्या गुंत्याकडे नवीन दृष्टीकोणाने पहिला तर हा सोडवणं सोपं जातं. गुंते सोडवायचे कि अजून वाढवायचे हे आपल्यावर! गुंत्या शिवाय आयुष्य म्हणजे अळणी जेवण.